दार उघडताच संध्याकाळी तुझे निरामय हास्य पहिले की
शिणलेल्या गात्रांवर परत आनंदाच्या धारांचा अभिषेक झाल्यासारखा वाटतो
आणि मनाच्या गाभाऱ्यातील मरगळलेल्या वातावरणावर,
तेथील प्रत्येक अणु-रेणुवर चैतन्याचा वावर पुन्हा पसरतो
मग हात-पाय धुतल्यावर तुला जेव्हा कडेवर घेतो
तेव्हा तुझ्या कोमल स्पर्शाने अन पवित्र सुवासाने
चंदनाच्या लाकडाचा मऊ स्पर्श आणि तोच पवित्र सुवास स्मरतो
तुझे बोलके डोळे पहिले की
देवाच्या फोटोवर गंधासोबत लावलेले फुल आठवते
अन तुझ्यासोबत खळखळून हसलो की
मनोभावे आरती म्हटल्याचे समाधान मनास लाभते
तू झोपी गेल्यावर तुझ्या मऊसुत चेहऱ्यावरून हात फिरवतांना
कापुरार्ती घेतल्याचा भास होतो
आणि अखेरीस दिवसाला दोनदा देवाची पूजा केल्याच्या समाधानात
मी पाठ टेकून निद्रेत विलिन होतो…

K Sarang