आबांची लाकडी काठी हल्ली कोपऱ्यात पडून असते
पण तरीही एक समाधान असते तिच्या चेहऱ्यावर
जबाबदारी पार पाडून मुक्त झाल्याचे…
त्याचे कारणही तसेच होते खास आणि आनंदी
आबांची हक्काची काठी परतली होती त्यांना
या पुढे आधार द्यायला…
तशी ही पण हक्काची काठी होती
पण रक्ताच्या नात्यापुढे सगळेच झूठ…
आबा पूर्वी आनंदाने सांगायचे
ती काठी दूर देशी असल्याचे
कालांतराने तीच गोष्ट ते सांगत
पण काहीश्या व्याकूळ मनाने…
गोष्ट एकच होती पण
तिचा अर्थ बदलला होता कालापरत्वे …
खरतर कोपऱ्यातल्या काठीचे अस्तित्व
आता इथे नसले तरीही चालण्यासारखे होते…
कारण आबा हल्ली अंथरूणालाच खिळलेले असतात
हक्काच्या काठीचा आधार घेत…
तरीही आबा नशीबवान म्हणून कि काय
हक्काच्या काठीने त्यांना साद दिली तरी…
असो…आता वेळ झाली आहे कोपऱ्यात पडलेली ती काठी
पलीकडच्या घरात राहणाऱ्या कमनशिबी आबांच्या हातात देऊन
नवीन आधार होण्याची…!

This poem is dedicated to all those old people who are still waiting….God knows for what…!

K Sarang