तुझ्या स्वागतासाठी झाडांनी
नव्या पानांचा रंगीत पोषाक चढवला आहे
तुझं येणं अधिक बहारदार व्हावं
म्हणून ढगांनाही नुकतीच सफेदी केली आहे
आभाळातील नीळाळी जास्त खुलून दिसावी म्हणून
वातावरणात थोडी नीळ मिसळली आहे
गवताच्या पात्यांना पण सक्त ताकीद देण्यात आली आहे,
दव बिन्दुंशी नीट सलोख्याने वागण्याची
फुलांना आणि भुंग्यांना पण समजावले आहे
की जास्त खेळलात तर स्वागता आधीच दमाल
ऊन, थंडी आणि पावसाला स्पष्ट कल्पना दिली आहे
कोणी केव्हा यायचे ते, आणि कसे
चंद्र आणि ताऱ्यांना रात्री
माफक तेवढाच उजेड पाडण्याचे बजावले आहे
सगळी तयारी झाली, आता मीच फक्त तयार व्हायचा राहिलो आहे
नेहेमी सारखा लेट-लतीफ
पण हरकत नाही, तू वेळेवर आल्यावर,
तू मला, मी शीळ वाजवत तयार होतांना पाहावं, हिच इच्छा आहे
म्हणजे मग खऱ्या अर्थाने स्वागत होईल तुझे आणि माझे सुद्धा…!

K Sarang