This is the sequel of चिंता…so please refer to चिंता, before reading चिंता २ 🙂

चिंतांचा शोध घेत अख्खं मन धुंडाळून काढलं
आणि हाती लागल्या बऱ्याच गोष्टी
ज्या असून सुद्धा कधी दिसल्याच नाही
किंबहुना असल्याचा विसरच पडला होता
काही हळवे क्षण सापडले ज्यावर थोडी धूळ बसली होती
काही कातरवेळापण दिसल्या कुठल्याशा एका कोपऱ्यात
आठवणींचे एक झुंबर होते लटकत एका नाजुकश्या दोरीवर
आणि इवल्याशा आशेच्या मिणमिणत्या प्रकाशात
काही स्वप्नं होती शेवटच्या घटका मोजत
उन्हाची एक तिरीप यावी आणि
त्या प्रकाशवाटेत धुळीचे कण स्वच्छ दिसावे
अगदी तसं वाटलं मला सगळं न्याहाळतांना
आणि एकदम वाटून गेलं की चिंतांना तर आपण बेघर करूच
पण त्यासोबतच मनही थोडं प्रकाशमय करू
दिवाळी जवळच आहे तेव्हा यंदा
घराला लावतात तसा आकाशकंदील मनाला पण लावायचा
आणि दिव्यांची आरास करून दिपोत्सव साजरा करायचा
पण दिवाळीपर्यंत तरी सगळी स्वप्नं,नाजूक आठवणी,हळवे क्षण
तसेच राहतील का याचीच आता चिंता लागून राहिली आहे…! 🙂

K Sarang