आज शेवटी पुस्तकानेच मिचकावला डोळा
आणि म्हणाले,किती रे तू भोळा!
आजपर्यंत अनेक डोळे मी पहिले
पण तुझे डोळे पूर्णवेळ काहीतरी वेगळेच सांगत राहिले
मला वाचताना भूभूळं कोणाची झाली मोठी
नाहीतर कोणाच्या भूवयान्मधली दुरी झाली छोटी
पण तुझे डोळे मात्र नेहेमीच शांत
कसाही असला प्रसंग तरीही अगदी निवांत
भल्या-भल्यांचे डोळे तर पाणावले सुद्धा
वाचतांना माझ्यातील भावविभोर मुद्दा
पण तुझी पापणी देखील नाही लवली
न तुझ्या डोळ्यात कुठली हूर-हूर जाणवली
अखेरीस मी बोलावया लागलो
उत्तर त्याचे स्वतः द्यावया लागलो
मी म्हटले मी भावांधळा झालो आहे
भावनांच्या बाबतीत वेंधळा झालो आहे
कुणी यास समाधिस्त अवस्था म्हणतात
तर कुणी ठार वेडा म्हणून कह्णतात
पण ही अवस्था पराकोटीच्या भावूकपणातून येते
भावनांचा कडेलोट झाला की ती खोल मनातून येते
ही शांतता जितकी स्तब्ध, तितकीच ती अशांत आत
जसे बर्फाच्या लादी खालून नदी जाई वाहत
ऐकून पुस्तकाच्या नयनी पाणी दाटले
आणि मुसमुसतच मग ते मला म्हणाले
इतके दिवस तू मला वाचत होतास
पण आज मी वाचले तुझ्यातल्या पुस्तकास
आनंद जितका मला वाचून होतो लोकास
किंबहुना त्या पेक्षाही जास्त आज झाला माझ्या मनास
पुस्तकास वाचून मग पुस्तकाने निरोप घेतला
पण पुढ्ल्यावेळेस मात्र ओळखीच्या नजरेने पुस्तकास भेटला
त्यावेळेस मात्र या पुस्तकाने त्या पुस्तकास मिचावाला डोळा
ओळखीचे हसू त्या वेळेस झाले मुखी दोघांच्या गोळा…!

K Sarang