हल्ली क्षितिजाकडे बघायचं कटाक्षाने टाळतो मी
स्वतःशी काही नियम आजकाल प्रकर्षाने पाळतो मी
कारण त्याचे एकच की, मग मी होडी काढायला बघतो
नी कशाचाही विचार न करता सरळ क्षितीज गाठायला निघतो
तिकडे किनारी मग मात्र स्मशान शांतता पसरते
थोडा वेळ स्मरून मला मग वाळू देखील विसरते
इकडे काय क्षितीज काही केल्या लागत नाही हाती
आणि तिकडे ठिपकाही न दिसावा इतकी दूर जातात नाती
परतून आल्यावर मग नवा परिचय अन नवी वेळ
कशाचा कशाला म्हणून सांगतो, नाही बसत मेळ
सोबतीस आणलेले मोती अन शंख-शिंपलेही लखलखायचे थांबतात
आणि किनाऱ्यावरची वाळू, ताड-माड, सर्व काही लांब-लांब भासतात
आताशा कुठे थोडा स्थिरावून किनारी एक झोपडी बांधली आहे
आणि शंख-शिंपल्यांची न्हवे तर इथल्या मातीचीच एक उबदार चूल मांडली आहे
आताशा किनाऱ्यावरचे पक्षीही मला छान ओळख देतात
आणि अस्मादिकाच्या गतकाळातील चुकांची सल रोज थोडी-थोडी नेतात
आताशा स्वप्ने कोणी दाखवली तर त्यावर प्रथम थोडासा भाळतो मी
पण अविचारीपणे क्षितिजाच्या मागे जायचं हल्ली नियमाने टाळतो मी.

K Sarang