बाळा तुझी आठवण येते ,पाण्याची डोळ्यात साठवण होते
हुंदके जरी नसतील सोबतीस, अश्रूंची शांत पाठवण होते

कधी कधी होतात भास ,
कडेवर तुला घेतल्याचे
मखमली केसात तुझ्या
गोंजारून हात फिरवल्याचे
चिमुकल्या तुझ्या मिठीसाठी
मन वेडावून जाते
बाळा तुझी आठवण येते…

निरागस हसणे तुझे
मनःचक्शुसमोर येता
मी ही हसतो इथे तेव्हा
स्वतःस आठवणीत नेता
हसता हसता नकळत
तेव्हा पापणी ओलावते
बाळा तुझी आठवण येते…

घुमते तुझे रडणे कधी
आठवते तुझे घडणे कधी
मुकतो तुझ्या बाळ लिलास
तुला अन तुझ्या पाळण्यास
(प्रश्न पडतो) क्षण जितुके मी मुकलो
बदल्यातील मोलाची व्यर्थ सारी गणिते
बाळा तुझी आठवण येते…

बाळा तुझी आठवण येते ,पाण्याची डोळ्यात साठवण होते
हुंदके जरी नसतील सोबतीस, अश्रूंची शांत पाठवण होते

K Sarang