शाळा आणि ती

This poem is inspired by Shala movie. Please note the characters and incidents depicted in this poem are altogether fictional and there is no resemblance to any person/place living/dead. And if someone finds one, then its purely coincidential… 🙂

शाळेत आल्यावर आधी तुझी वाटर-बैग बघून घ्यायचो
त्याच्या शेजारी आपला डबा नकळत लोकांच्या ठेवून जायचो

मानेला हलकेच वळवून जेव्हा तू हळुवार हसायचीस
जोशी आणि फडक्याच्या मधून तू मला अगदी स्पष्ट दिसायचीस

चेहऱ्यावरून मोर पीस फिरल्याचा तेव्हा भास व्हायचा
तेवढ्यात गणिताचा तो बोकारे मास्तर माझा चांगलाच क्लास घ्यायचा

गणिताच्या तासाला मी भलतेच गणितं मांडत बसायचो
आणि पकडल्या गेल्यावर मात्र खूप खूप मार खायचो

दोन छड्यानच्या मधल्या अवधीत तुझ्याकडे चोरून बघायचो
दुखी तुझे भाव बघता मनातून पुरता आनंदून जायचो

ऑफ पिरिएड मध्ये जेव्हा मी करकरे बाईंची नक्कल करायचो
कौतुकाने हसणाऱ्या तुझ्या चेहेऱ्याकडे पाहून खूप सुखावून जायचो

माझ्या डब्यातली कारल्याची भाजीही मला तेव्हा गोड लागायची
मधल्या सुट्टीत जेव्हा जेवायला तू माझ्या शेजारी बसायची

“साखळी-शिवाशिवी” खेळतांना ठरवून तुझाच हात पकडायचो
आणि नंतर उगाच हळू हळू पळून बाकीच्यांना पकडायचा आव आणायचो

घरी जातांना शाळेतून, तुझ्या रिक्षामागे हळूच निघायचो
अगदी साळसूदपणे आकस्मिक भेट झाल्यासारखा चेहेऱ्यावर भाव आणायचो

रात्री गेल्यावर देखील तुझ्याच विचारात कायम रमायचो
अभ्यास वगरे झाल्यावर स्वप्नात तू दिसशील या विचारताच शेवटी निजायचो

K Sarang